श्री.के.एल.खाडे साहेब अभिष्टचिंतन-संजय सोणवणी.

या वयातही ताठ कण्याने समाजसुधारणेसाठी धावपळ करणा-या, सतत कार्यमग्न राहणा-या श्री. के. एल. खाडेकाकांनी अज ९१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. अशीच कार्यमग्नता त्यांना पुढेही लाभो आणि त्यांना अशच उत्तम आरोग्यासहित उदंड आयुष्य मिळो या शुभकामना.

“माझी बखर” हे त्यांचे मोकळे ढाकळे आत्पकथन प्रसिद्ध तर आहेच पण रेल्वेच्या विश्वावर प्रकाश टाकत त्याचे अंतरंग उलगडणारे “मी स्टेशनमास्तर” हेही पुस्तक प्रसिद्ध आहे. “माझी बखर” ला मी लिहिलेल्या प्रस्तावनेतील हा अंश त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकते.

“के. एल. खाडॆ यांचे आत्मचरित्र हे त्यांचे, त्यांच्या परिवाराचे व त्यांच्या स्मरणात असलेल्या पुर्वजांचे तर आहेच पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्यपूर्व ते जागतिकीकरणापर्यंतचा वर्तमानातील काळ याचा ग्रामीण भागातील गावगाड्याचा, निरंतर बदलत राहिलेल्या समाजाच्या जीवनबदलाचा व नातेसंबंधाचा एक विलक्षण दस्तावेज आहे. निपाणी-वडगांव या आता स्मृतीशेष झालेल्या, उध्वस्त अवशेषांनी भरलेल्या गांवचा त्यांच जन्म. हा परिसरच तसा पुरातन वस्त्यांच्या अवशेषांनी भरलेला. निपाणी-वडगांवचाच इतिहास हृद्यपणे सांगत या वेगळ्या चरित्राची सुरुवात होते. गांवची (आजही फारशी बदललेली नसलेली) जातीनिहाय गल्ल्यांची रचना, गढी, गांवबारव यांचा इतिहास, मोठ्या बांधकामांत त्याकाळी कसे नरबळी दिले जायचे याच्या कथा जागवत आपण अल्लादपणे खाडे घराण्याच्या इतिहासात घुसतो. आपल्याकडे आजोबा-पणजोबांच्या पलीकडे पुर्वजांची नांवेही कोणाला माहित नसतात…त्यांचे जीवनचरित्र माहित असणे ही तर दुरची बाब. आम्ही इतिहासाबद्दल मोठ्या जोशात बोलत असतो, पण स्वत:च्या इतिहासाचे काय हा प्रश्न विचारला तर सर्वत्र नन्नाचा पाढा ऐकू येईल अशी स्थिती.

पण खाडॆकाकांनी ज्ञात पुर्वजांबद्दल जेवढे माहित आहे ते लिहून ठेवल्याने भविष्यातील पिढ्यांची मोठीच सोय करुन ठेवली आहे. वयाच्या पाच-सहा वयापसुनचा स्वत:चा, स्वत:च्या परिवाराचा आणि सोबतच समाजाचाही इतिहास ते मांडत जातात आणि माहित असुनही माहित नसलेले, ज्ञात तरीही अपरिचित जगात आपण प्रवेशू लागतो. सामान्य माणसाचा इतिहास असामान्य बनतो तो त्या माणसाच्या जीवनावरील अथांग प्रेमामुळे, जीवनावरील अपार निष्ठेमुळे आणि सहनशील आणि क्षमाशील वृत्तीमुळे. कोणत्याही घरामद्धे थोरला म्हनून जन्माला येणे हेच एक दिव्य कसे बनून जाते हे खाडेकाकांच्या जीवनावरुन लक्षात येते.

खाडॆकाकांचे शिक्षण, त्यांचा विवाह, त्यांचे शिक्षक म्हणून शिक्षणक्षेत्रातील मुशाफिरी आणि शेवटी रेल्वे हेच आपले भागधेय मानत, सामाजिक संवेदना जपत, परिवाराला मोठ्या कष्टाने कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढत जरा बरे दिवस येताहेत असे वाटु लागताच आजवर जपलेले एक्त्र कुटुंबाला लागलेला विभाजनाचा शाप आणि कसलीही वाटणी न मिळता सहन करावा लागलेला कौटुंबिक कलह….पुन्हा एकला चालो रे….पण समाजासोबत. सामाजिक कार्यात त्यांनी झोकून दिले ते आजतागायत. मंडल आयोग संघर्ष समिती स्थापन करणारे महाराष्ट्रातील ते पहिलेच. पेंशनरांच्या संघटनेतील त्यांचे काम असो कि प्रवासी संघटनेतील, धनगर समाजाच्या ऐक्यासाठीचे काम असो कि अन्य कोणतेही सामाजिक कार्य…ते उत्साहाने त्यात वावरत राहिले. काही प्रयत्न अयशस्वी झाले तर काही यशस्वी. हे करित असतांना त्यांनी आपला परिवार, त्याचे सौख्य याचीही काळजी घेतली. कसेही वागले असोत, ते बंधू आणि अन्य नातेवाईकांबाबत आगपाखड न करता अत्यंत सहृदयतेने वर्णन करणे हे अत्यंत अवघड. पण खाडेकाकांनी ते अत्यंत सहजतेने केले आहे म्हणून जास्त मनोज्ञ आहे.

सहधर्मचारिणीबाबत लिहितांना ते भावूक न होताही तिच्या जीवनातील योगदानाचे, निस्पृहतेचे आणि कष्टांचे जे वर्णन येते ते अगदी कोरड्या भाषेत आले तरी खाडेकाकांच्या अंत:करणात हेलकावणारा भावनोद्रेक त्या कोरडेपणातुन अधिक टोकदार होतो. खाडेकाकुंचे निधन दिडेक वर्षांपुर्वी झाले. अंधश्रद्धा, कर्मकांडांबद्दल अनास्था असणा-या खाडेकाकांनी त्यांचा पहिला स्मृतीदिन व्याख्यान ठेवून साजरा केला. कोणतेही धार्मिक कर्मकांड केले नाही. हा अस्सल पुरोगामीपणा अंगी असणा-या खाडॆकाकांना जेंव्हा काशी-बनारसची तीर्थयात्रा सहपरिवार करावी लागली ते प्रसंग वर्णन करतांना कसलाही ढोंगी पुरोगामीपणा डोकावत नाही. इतरांच्या भावनांची, श्रद्धांची कदर न करता हेकेखोरपणा करणारे पुरोगामी कसे असू शकतील हा प्रश्न त्यातून निर्माण होतो.

अस्पृष्यतेचा अभिशाप भारतियांना कधी लागला ते माहित नाही. पण खाडेकाकांनी प्रत्यक्ष अस्पृष्यता निर्मुलन करण्याचा प्रयत्न स्वत:पासून, प्रसंगी त्रास सोसत केला. ते स्वत:ला आपण त्यावेळी समाजसुधारक होतो असे मानत नाहीत. गावगाड्यातील जातीयवादाची धग या कथनातून अंगावर येईल एवढी जाणवते. अस्पृषता त्यांना स्वत:लाच मान्य नव्हती आणि ते प्रसंगी ती तोडतही असत. या संदर्भातील वर्णने मुळातुनच वाचण्यासारखी आहेत. तत्कालीन समाजस्थितीची तुलना सहजपणे आजच्या पुरोगाम्यांशी केली तर आजचे पुरोगामी केवढे दांभिक आहेत हे सहज दिसून येईल. खरे असे आहे कि क्रांती व्यक्ती घडवते. स्वत:त बदल घडवून घडवते. तिचे ढोल बडवून क्रांती होत नसते. असे हजारो-लाखो-कोटी व्यक्ती जेंव्हा स्वत: त्याचे स्वेच्छेने स्वप्रेरणांचे पाईक बनतात तेंव्हाच क्रांती वैश्विक होते…चिरायु होते. क्रांती घोषणांत नसते…आंदोलनांत नसते….क्रांती जगण्यात असते…आणि खाडॆकाकांनी त्यांचे क्रांती केली. इतिहासाने त्याची दखल घ्यायचे काहीएक कारण नाही. कोट्यावधी अशाच शहिदांच्या प्रेतांवर उभा राहून जो ओरडतो…तोच क्रांतीकारक म्हणून जग दखल घेते हा जागतिक इतिहासाचा नियम आहे. पण खाडॆकाकांनी, गांवगाड्यातील सर्व सामाजिक कायदेकानुनांना त्यांच्या परीने वागण्यातुन ही क्रांती घडवली जी अगदी त्यांच्या रेल्वे जीवनातील अठरापगड सहका-यांशी वागतांना, सनातन्यांना लाजवत सुरु राहिली…आणि हीच क्रांती असते.

या पुस्तकाचे नामकरण “माझी बखर” आहे. बखर वाड्मय शैली महाराष्ट्रात आता कोणी वापरत नाही. याही पुस्तकात ती शैली नाही. तरेही ही बखर आहे कारण बखरीप्रमाणेच “जसे घडले, जसे दिसले, जसे भोगले तसे” हा बाणा या लेखनात आहे. त्यामुळे हे नांव सार्थही आहे, कारण ही के. एल. खाडे या माणसाची जीवनकहानी नाही तर प्रत्येक सामान्य माणसाची कहानी आहे. आणि म्हणुनच ती असामान्य आहे.

* * *

या आत्मचरित्रात अजून काय आहे, कोणत्या घटना आहेत, हे येथे सांगण्याचे प्रयोजन नाही. तुम्ही ते पुढे वाचणारच आहात. मला भावलेले महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीतून आज जवळपास हद्दपार झालेल्या असंख्य ग्रामीण शब्दांची यात लेखनाच्या ओघात येणारी बरसात. ग्राम्य म्हणजे शिव्याच असा काही तरी समज सारस्वताचा आहे. पण शेती, दैनंदिन जीवन यासंबंधात मराठीत अनेक लोभसवाने शब्द आहेत आणि ते मराठी भाषेची शान आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. गुर्हाळातील चुल्हानाला ’चुलंगण” हाही एक प्रतिशब्द आहे हे या आत्मचरित्रातून कळते. असे अनेक शब्द लिलया येवून जातात आणि मराठीचे वैभव कळते. नगर जिल्ह्याची ही शब्दसंपन्नता आगळीवेगळी आहे.

हे आत्मकथन एक सामाजिक दस्तावेज आहे असे मी म्हटले. आजकाल लग्ने, अगदी सामान्य शेतक-यांच्या मुला-मुलींची कशी लागतात हे पाहिले कि त्यांचेच नजिकचे पुर्वज किती सामान्यपनात लग्नसोहोळ्याचा असामान्य आनंद घेत असत हे त्याना समजत नाही याची त्यांना शरमच वाटेल. पुर्वीचे विवाहसोहोळे नात्यांचा उत्सव असे, श्रीमंतीचे ओंगळवाने प्रदर्शन करणारे नसत हे या चरित्रातील २-३ लग्नांचे अत्यंत सविस्तर वर्णन वाचून समजते. हा कालप्रवास आपल्याला समज देणाराही आहे.

प्रारंभिक शैक्षणिक व शिक्षकाच्या हलाखीचा, परवडीचा काळ सोडला तर खाडॆकाकांचे निवृत्तीपर्यंतचे आयुष्य रेल्वेला वाहिलेले आहे. हाही प्रवास खडतर आहे. रेल्वेच्या युनियनचेही काम पाहत त्यांनी असंख्य रेल्वे कर्मचा-यांना न्याय मिळवून दिला. त्यांचे “मी स्टेशनमास्तर” हे एक प्रकाशित झालेले पुस्तक तर रेल्वेच्या जगावर अद्भूत प्रकाश टाकते व रेल्वे समजावून घ्यायला मदत करते. त्या पुस्तकात आलेले तपशील खाडेकाकांनी या पुस्तकात टाळले आहेत. वाचकांनी मात्र ते पुस्तक अवश्य मिळवून वाचावे कारण भारतीय रेल्वेचा व रेल्वेच्या एकंदरीत जगाचा तो एक चित्तथरारक दस्तावेज आहे. वेळोवेळी सर्व घटनांच्या नोंदी करुन ठेवण्याची शिस्त, जी बहुजनांत अपवादानेच पहायला मिळते, असल्याने कोठेही, अगदी तारखांपासुनही, घोळ-संभ्रम होत नाही.”

खाडेकाका हे बहुजनांच्या शिकलेल्यांच्या पहिल्या पिढीचे बिनीचे शिलेदार. बहुजनांचे जीवन अलीकडे-अलीकडेपर्यंत आपल्याकडे सहसा साहित्य अथवा चरित्रांचा विषय होत नसे. इतिहासही त्याची नोंद घेत नाही. त्यामुळे काळाच्या ओघात बहुजनांचा, सामान्यांच्या जगण्याचा केवढा मोठा मोलाचा इतिहास नष्ट झाला असेल याची जाणीव “माझी बखर” वाचतांना होते. हे पुस्तक एका व्यक्तीचे, परिवाराचे, त्या परिवारातील अंतर्गत प्रेम-माया-संघर्ष-असुयेचे एकांगी बनत नाही तर ते निपाणी-वडगांव-नगर-श्रीरामपुरचे चरित्र बनते आणि हेच या कथनाचे वैशिष्ट्य आहे. भाषेतील अलिप्तता, आलंकारिकतेचा सोस नसलेली साधी सरळ पण भिडणारी भाषा, स्वत:च्या व इतरांच्याही चुका आणि सद्गुण निर्लेपपणे दाखवायची वृत्ती यामुळे हे चरित्र वाचकांना जास्त आपले वाटेल व भावेल याची खात्री वाटते.”

-संजय सोनवणी
————————————————–
अभिष्टचिंतन श्री.के.एल.खाडे साहेब, सेवानिवृत्त स्टेशन मास्तर, श्रीरामपूर.

चाळीस वर्षापूर्वी जेव्हा टेलिफोन सुद्धा दुर्मिळ होते,गावात एस.टी.बस नव्हत्या व संपर्काचे साधन म्हणजे पोस्टकार्ड होते तेव्हा खाडे साहेब महाराष्ट्रभर फिरत, चांदा टू बादा समाज ऐकत्र यावा,रोटी बेटी व्यवहार व्हावेत व महाराष्ट्रातील बहुजन मंडळीने सामाजिक, शैक्षणिक प्रगती साधावी हा त्यांचा त्या काळातील दुरदृष्टीकोन. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राला धनगर समाजाला नात्याच्या धाग्यात जोडणारा पहिला सोयरीक संबध बहुतेक खाडे साहेबांच्याच हातचा.साहेबांनी त्या काळात समाजातील अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन केले जे महाराष्ट्रात गाजले.
निवृत्ती नंतरही खाडे साहेब जेष्ठ नागरिक, प्रवासी संघटना, पेन्शनर अन कोणकोणत्या संघटनाचे काम करतात,त्यांचे जिवन एखाद्या तपस्व्यासारखे वाटते.अशी माणसं आजच्या काळात दुर्मिळच आहेत.
श्री.खाडे साहेबांचे चिरंजीव श्री.अविनाश, श्री.प्रकाश यांनी सुद्धा खाडे साहेबांच्या पावलावर पाउल ठेवून समाजकार्याला सुरुवात केली आहे.
आज श्री.के.एल.खाडे साहेबांचा वाढदिवस आहे,त्यांना शतायुष,सुआरोग्य लाभो अशा शुभेच्छा.

शुभेच्छुक
मा.आ.हरिदास भदे,अकोला
श्री.सदाशिव काळदाते, शालिग्रामजी काळदाते, डॉ. सुभाष काळदाते, विनायक काळदाते, ईजी.अनिल जाधव,बबनराव साळवे,हिमांशू शिदे,भागवतराव जाधव,रावसाहेब सोनवने,अकोला,नाशिक, अहमदनगर, वर्धा, नागपूर येथील सर्व आप्तेष्ट व मित्र परिवार.

महाराष्ट्र, वाढदिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *