मुंबई
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले एवढेच नाही तर कोरोनाविरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे.
या स्वंयशिस्तीची आणि एकात्मिक प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देतांना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला.