पाउस  दडला हिमालयात.

पुणे : आशिष देशमुख

नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र ओलांडून उत्तरेतून थेट हिमालय व उत्तरांचल पर्वत रांगांत मुक्कामी गेला आहे. त्यामुळे 12 ते 14 जुलै या पाच दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात उघडीप राहणार आहे. 14 नंतर काही भागात तो सक्रिय होणार असला, तरी जोरदार कोसळणार नाही. 19 जुलैपर्यंत हलका पाऊस राहील. त्यानंतरही हवेचा दाब वाढून मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी वर्तविला आहे.

मान्सूनने यंदा संपूर्ण देश बारा दिवस आधीच व्यापला होता. एरव्ही 8 ते 10 जुलै रोजी मान्सून देशात सर्वत्र पोहोचतो आणि धो धो कोसळतो; पण यावर्षी त्याने 26 जून रोजी संपूर्ण देश व्यापला.सध्या हा पाऊस थेट हिमालयाच्या पर्वत रांगांत दडला आहे. महाराष्ट्रात हवेचा दाब वाढल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे.रिमझिम किंवा काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल; पण मुसळधार पावसाने 14 जुलैपर्यंत जणू सुट्टीच घेतली आहे.हा प्रभाव कमी-अधिक प्रमाणात 19 जुलैपर्यंत राज्याच्या काही भागात राहील. त्यानंतरही हवेचा दाब वाढून जुलैअखेर पर्जन्यमान मध्यम स्वरूपाचे राहील.

जूनमध्ये काही जिल्हे कोरडे

सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग वगळता विदर्भात पावसाने उघडीप घेतली आहे. 11 जुलैपासून तो आणखी कमी होत आहे. यंदा पुणे, कोल्हापूर, सांगली, विदर्भातील यवतमाळ, मुंबई या भागात पाऊस खूपच कमी झाला. यंदा जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मान्सूनचा पॅटर्न पूर्णपणे बदलून टाकला आहे. कोकणातून थेट मराठवाड्यात गेल्याने सर्वाधिक पाऊस मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत झाला.

जूनच्या सरासरीच्या 57 टक्के जास्त पाऊस मराठवाड्यात झाला, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 48 टक्के अधिक, कोकण भागात सरासरीपेक्षा फक्त तीन टक्के अधिक आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा उणे एक टक्का पाऊस कमी झाला आहे.

महाराष्ट्रातून पाऊस सध्या हिमालयात गेला आहे. 10 जुलैपासूनच पावसाचा जोर कमी झाला. तो आता हिमालयात मनसोक्त बरसून महाराष्ट्रात 14 जुलै रोजी येण्याची शक्यता आहे. तोही मध्यम स्वरूपात परत येईल. 19 जुलैनंतर थोडा जोर धरेल; पण यंदा जुलैमध्ये पाऊस जून इतका मोठा दिसत नाही.
– अनुपम कश्यपी,
हवामान विभागप्रमुख, पुणे वेधशाळा

सध्या महाराष्ट्रात हवेचा दाब हा 1,004 हेक्टा पास्कल इतका आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला आहे. हा दाब जेव्हा 1,002 वर खाली येतो, तेव्हा मुसळधार पाऊस येतो. 14 जुलैनंतर पुन्हा पाऊस सुरू होईल; पण त्याला जोर राहणार नाही. एकूणच जुलै महिन्यात हवेचा दाब जास्त वाढणार आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी राहील, असा अंदाज रेन मॉडेलवरून दिसतो आहे.
– रामचंद्र साबळे,
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

DailyhuntReport
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Pudhari

Breaking News, महाराष्ट्र, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *