
नवी दिल्ली- तेलाचे वाढणारे भाव आणि पुरवढ्याच्या अनिश्चिततेपासून वाचण्यासाठी भारताने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सध्या तीन मोठे राखीव तेल भांडार आहेत. पहिल्यांदाच भारताने परदेशात आणीबाणीसाठी राखीव तेल भांडार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत आता आपले काही तेल अमेरिकेमध्ये साठवेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी याची घोषणा केली. दोन्ही देशांमध्ये सामरिक पेट्रोलियम साठ्यासंबंधी करार झाला आहे. या तेलाच्या भांडाराची किती क्षमता असेल याची माहिती दिली गेली नाही. मात्र, भारत मोठ्या क्षमतेचे भांडार करण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेमधील संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत होतील, असं मानलं जात आहे.