राज्याच्या कृषी  आयुक्त पदी श्री. धीरजकुमार.

पुणे – राज्याच्या कृषी आयुक्तपदी धीरज कुमार यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते उत्तर प्रदेशात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांनी 2016 मध्ये राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणूनही काम केले आहे.
धीरज कुमार हे आएएस श्रेणीतील महाराष्ट्र केडरच्या 2005 च्या तुकडीतील अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. धीरजकुमार हे अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च शिक्षित असून, त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले आहे. 2012 ते 2015 या दरम्यान त्यांच्याकडे नांदेड जिल्ह्याधिकारी पदाची जबाबदारी होती. जुलै 2016 ते मे 2017 पुण्यात ते शिक्षण आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात नियमबाह्य मान्यतांप्रकरणी त्यांनी दोषींवर मोठी कारवाई केली होती. 2018 पासून ते प्रतिनियुक्ती उत्तर प्रदेशात सरकारच्या सामाजिक विकास विभागात विशेष सचिव म्हणून होते. उत्तर प्रदेशातील पणन विभागाचे संचालकपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे होती.
आधीचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची पीएमआरडीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची बदली झाली होती. दिवसे यांनी सोमवारी (ता.13) आयुक्तपदाची सूत्रे सोडली होती. शासनाने कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने यांना आयुक्तपदाची तात्पुरती सूत्रे स्वीकारण्याचा आदेश दिला होता. कृषी आयुक्तपदासाठी कायम नियुक्ती न झाल्यामुळे राज्यभर नव्या आयुक्तांबाबत उत्सुकता होती. धीरज कुमार यांच्या नियुक्तीने आता कायमस्वरूपी आयुक्त कृषी विभागाला मिळाले आहेत.
‘सकाळ’शी बोलताना नवे आयुक्त धीरज कुमार यांनी कृषी खाते शेतकरीकेंद्री करण्याचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी काल भेटलो. त्यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात सुधारणांची आवश्‍यकता आहे, याकरिता अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि सचिव यांचा कृषी विकासाचा जो अजेंडा आहे, त्यानुसार कामास प्राधान्य असेल.’’
‘‘शेतकरी केंद्रित कृषी विभाग असण्याकडे माझा आग्रह असेल. प्राधान्याने बाजार समित्यांमधील डिजिटाझेशन, शेतकरी कंपन्यांना अधिक प्राधान्य देऊन मोठ्या खरेदीदारांपर्यंत त्यांना पोचविणे, कृषी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे, बी-बियाणेपासून मार्केटिंगपर्यंत सर्व सुविधा एकाच व्यासपीठावर कसे आणता येईल, याकडे जास्त लक्ष देणार आहे. कृषी क्षेत्रात चांगल्या बदलांसाठी माझे प्रयत्न असतील. आज मी पदभार स्वीकारणार आहे,’’ असे धीरज कुमार यांनी सांगितले.

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *