समाजनेते कै.अभिमन्यू शेंडगे यांना विनम्र श्रद्धांजली

अभिमन्यूदादा शेंडगे यांच्या अचानक जाण्यामुळे “धनगर जमातीच्या सामाजिक – राजकीय आणि वैचारिक चळवळीची हाणी”, जमातीची ‘उन्नती’ आणि ‘प्रगती’ यासाठी धडाडणारा “ज्वालामुखी” विझला.

🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

भावपूर्ण श्रद्धांजली !

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

धनगर साहित्य परिषद, आदिवासी धनगर साहित्य संमेलनं, धनगर समाज प्रबोधन समिती, धनगर समाज उन्नती मंडळ, धनगर ऐक्य परिषद, वंचित बहुजन आघाडीच्या जडणघडणीत लाख मोलाचे योगदान देणारे सच्चे सामाजिक कार्यकर्ते, नेते, जेष्ठ समाजसेवक आणि बाळूमामाचे सच्चे भक्त व स्वतःच्या गावात बाळूमामांचे मंदीर उभारण्यासाठी धडपडणारे बाळूमामाचे एक सच्चे भक्त, वडीलधारी मा. श्री. अभिमन्यूदादा शेंडगे आपल्यातून अचानक निघून गेले. त्यामुळे धनगर जमातीच्या अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. ते ठाणे शहरात राहत होते. व्यवसायाने रिक्षा चालक असलेले दादा अत्यंत मितभाषी, शांत, संयमी मात्र जमातीच्या हितासाठी तितकेच आक्रमक म्हणून प्रसिद्द होते. त्यांना –हदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यांनी हे जग सोडले. मात्र त्यांच्या अनेक पवित्र स्मृती आजही जमातीच्या ध्यानी-मनी वसल्या आहेत.

मृत्यू दादांना घेवून गेला. मात्र दादांनी उभ्या केलेल्या चळवळीच्या ओझ्याने आणि दादांच्या स्वाभिमानी बाण्याने त्यांना घेवून जात असताना तो मृत्यूही कदाचित वाकला असेल, आपल्या दादासमोर झुकला असेल, सर्वांना भेडसावणा-या त्या मृत्यूनेही दादांसमोस सपशेल लोटांगण घातले असेल, दादांनी त्यालाही खडसावले असेल कारणं दादा हे स्वाभिमानाचा ज्वलंत अंगार होते. विचारांसोबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांची वैचारिक उंची दांडगी होती. त्यांचे कार्यकर्तुत्व हे डोंगराला भिडणारे होते. त्यामुळे मृत्यूही दादांसमोर खुजा ठरला असेल. दादांना यापुर्वीही –हदयविकाराचा धक्का बसला होता. मात्र समाजाची उन्नती आणि प्रगतीचा ध्यास घेतलेले, संकंटांची अनेक वादळं लिलया परतवून लावणारे दादा त्यामुळे हबकले नाहीत. त्याऊलट ते चालतच राहिले. दादा नेहमी माणसात असायचे त्यांना आपल्यासोबत माणसं नसली की करमत नव्हते. अनेकदा आपला रिक्षा व्यवसाय बंद ठेवून दादा सामाजिक आंदोलनात सहभागी व्हायचे, मोर्चे, मेळावे, बैठका, गाठी – भेटी यामध्ये रमलेले दादा कदाचित लॉकडाऊनमुळे एकटे पडले असावेत. त्यामुळेच त्यांच्या मनाची घालमेल झाली असावी, माझ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना मी भेटू शकत नाही. याची खंत त्यांच्या मनाला लागून राहिली असावी. त्यामुळेच एकटे पाहून या धक्क्याने त्यांना पुन्हा गाठले असावे. परंतू,,, हे मृत्यू…. तू एक गोष्ट लक्षात ठेव…! तू कांही चांगले केले नाहीस !! तू धनगर जमातीच्या सामाजिक चळवळीचा मुकूटमणी पळवला आहेस. तुला आम्ही कदापी माफ करणार नाही.

धनगर आरक्षण लढाई जिंकणे हे दादांचे स्वप्नं होते. त्यासाठी ते अहोरात्र महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधायचे तासन् तास गप्पा मारायचे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने त्यांचे हे स्वप्नं अपुर्ण राहिले आहे. म्हणून, मृत्यू तू फार निर्दयी वागलास, निर्दयी झालास….! परंतू दादा जिवंत आहेत. ते त्यांच्या कार्यकर्तुत्वाने, विचाराने आमच्या –हदयात जिवंत आहेत. त्यांचे स्वप्नं साकार करणे हे आता आमचे कर्तव्य झाले आहे.

मुंबईहून दादा अनेकदा बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूरला जात असत. त्यामुळे एकदा वाटेत थांबून दादा कोल्हापूरला माझ्या घरी मुक्कामाला आले होते. दादा दोन दिवस थांबले. यानिमित्ताने दादांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. एवढ्या मोठ्या समाजसेवकाचे पाय माझ्या घरी लागले म्हणून मी देखिल धन्य झालो. त्यावेळी दिवसभर दादांचा फोन चालू होता. सर्वांना फोन करुन सांगत होते. ऐकलं का…! आज मी कोल्हापूरात अमोलच्या घरी मुक्कामाला आहे. अमोलसोबत समाजाविषयी, चळवळीविषयी गप्पा मारतोय. आता मी दोन दिवस अमोलसोबत राहणार आहे. आणि दादांनी त्या दोन दिवसात माझ्या कुटुंबातील सर्वांची मनं जिंकली. त्यानंतर दादांनी आम्हाला निरोप देताना सांगितले की, मुंबईला आल्यानंतर तुम्ही सर्वजण माझ्या घरी या… त्यानंतर पुढे कांही दिवसांनी, आम्ही मुंबईला गेल्यानंतर दादांनी आमचा जो पाहूणचार केला. तो आजही जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर आहे. दादा मला जयसिंगतात्या शेंडगे यांची फॉर्च्यूनर गाडी घेवून ठाण्यातील आमच्या मावशीच्या घरी घ्यायला आले. घरी नेवून आदरणीय जयसिंगतात्या शेंडगे, तुकाराम पाटील, डॉ. अभिमन्यू टकले आणि कार्यकर्त्यांसमवेत जेवू घातले. अनेक विषयावरती दिवसभर गप्पा मारल्या आणि पुन्हा दादा सोडायला आले. सामाजिक चळवळींमुळे महाराष्ट्रभर फिरुन ज्या – ज्या वेळी मी मुंबईला जायचो त्या – त्या वेळी दादा एक फोन मला करायचे आणि विनंती करायचे अमोल आज जेवण करण्यासाठी आमच्या घरी ये. दादांच्या आग्रहाखातर मी अनेकदा ठाण्यातील त्यांच्या घरी गेलो. परंतू जेवण हे एक निमित्त असायचे दादांचा खरा हेतू तर चळवळीवरील गप्पा मारायच्या हाच असायचा. त्यांना कार्यकर्त्यांचा सहवास आवडायचा. त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नीने आणि मुलाबाळांनीही त्यांना नेहमी मदत केली. अनेक कार्यकर्ते अगदी हक्काने घरी यायचे आणि त्या सर्वांची ख्याली – खुशाली, चहा – पाणी, नाष्टा, जेवण आदी सर्व गोष्टी हे सर्वजण मनापासून करायचे कारण दादांचे संस्कार… आपला कार्यकर्ता ऊपाशी राहिला नाही पाहिजे. कार्यकर्ता जगला तरच चळवळ जगेल. कार्यकर्ता तंदुरुस्त तर चळवळ तंदुरुस्त हा दादांचा चळवळीतला साधा फॉर्म्यूला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांची काळजी घेणं, त्यांचे आरोग्य सांभाळणं, घरच्या मंडळींची ख्याली – खुशाली विचारणं हा दादांचा छंदच होता.

वय वाढलं तरीही दादांनी कधी शरीर स्वास्थ्याची तक्रार केली नाही. आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असताना रात्र – रात्र प्रवास करुन मुंबई – सोलापूर, मुंबई – लातूर असा प्रवास केला. पत्रकार परिषदांसाठी ते जयसिंगतात्यांसमेवत सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, पुणे, जळगांव अशा विविध भागात फिरत राहिले. मोजकेच बोलणे पण महत्वाचे आणि मुद्द्याचे बोलणे ही त्यांच्या वक्तृत्वाची खासियत होती. त्यामुळे ते बोलत असताना लोक कानात जीवं आणून ऐकायचे. वंचित बहुजन आघाडीच्या स्थापणेतही त्यांचा महत्वाचा वाटा होता. धनगर जमातीची बाजू ते अगदी भक्कमपणे मांडायचे. परिस्थितीने गरीब असला तरी मनाने श्रीमंत असलेल्या दादांचे जे कांही मोजके मित्र होते. त्यामध्ये मा. श्री. तुकाराम पाटील साहेब यांचे नाव सर्वात वरती आहे. तुकाराम पाटील आणि अभिमन्यूदादा शेंडगे यांची जोडगोळी पाहण्याची सवय माझ्या डोळ्यांना लागली आहे. आज हे चित्र मला पुन्हा दिसणार नाही. तुकाराम पाटील यांनीच मला दादा आपल्याला सोडून गेल्याची माहिती दिली. त्यावेळेस माझ्या पायाखालची वाळूच सरकली. माझा या बातमीवर पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. मात्र वस्तुस्थिती तशीच होती. त्यानंतर तुकाराम पाटील यांच्यासोबत दादांविषयी खुप बोललो. ते पण् दादांच्या अशा जाण्याने प्रचंड शोकाकूल झाले आहेत.

अनेकदा मुंबईत जयसिंगतात्या शेंडगे यांच्या ऑफिसमध्ये जयसिंगतात्यांसमवेत अभिमन्यूदादा शेंडगे, तुकाराम पाटील, डॉ. अभिमन्यू टकले, अविनाश बर्वे, दत्तात्र्यय व्हरगळ, चिंगाप्पा ईरकर, अमोल पांढरे, सयाप्पा मेटकरी, विष्णू पुकळे आणि अन्य कार्यकर्त्यांची बैठक होत असे. आजही या बैठका सुरु असतात. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व राजकारण आणि समाजकारणाची चर्चा व्हायची. त्यातून अनेक आंदोलने उभी राहयची. धनगर आरक्षण लढा, सोलापूर विद्यापीठ नामांतर लढा, आदिवासी धनगर साहित्य संमेलनं, धनगर साहित्य परिषद, वंचित बहुजन आघाडी, पंढरपूर येथिल धनगर आरक्षण आणि सत्ता संपादन मेळावा, विद्यमान मुख्यमंत्री महोदयांची भेट, धनगर ऐक्य परिषद, अशा अनेक संघटना, पक्ष, चळवळी, विचार, भुमिका या सर्वांना आकार ऊकार देण्याचे काम याच कार्यालयातून झाले आणि अभिमन्यू दादा शेंडगे यांचे या सर्व गोष्टींमध्ये लाख मोलाचे योगदान आहे.

धनगर जमातीला एन.टी आरक्षण लागू झाले. परंतू त्यासाठी जी चळवळ उभारण्यात आली होती. त्यामध्ये दादांचा वाटा फार मोठा होता. त्यानिमित्ताने ते महाराष्ट्रभर फिरले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील कार्यकर्ते, नेते आजही त्यांना ओळखतात. महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष अँड. आण्णारावजी पाटील साहेब यांच्यापासून ते अगदी अविनाश बर्वेपर्यंत सर्वांसोबत त्यांचे मैत्रीचे आणि घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. एखादा विषय हातामध्ये घेतला तर तो तडीस न्यायचा हा त्यांचा शिकस्ता होता. त्यामुळे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रभर फिरत होतो. त्यावेळेस ते घरुन भाकरी बांधून आणायचे. आपल्या कपड्यांची बॅग सोबत ठेवायचे. कोणत्याही ठिकाणी असेल त्या परिस्थितीत मुक्काम करुन दुस-या दिवशी सकाळी पुढचे गावं गाठायचे परंतू, ज्यास्तीत जास्त माणसं संमेलनात आली पाहिजेत. ज्यास्तीत जास्त समाजबांधवांपर्यंत आपण पोहचलो पाहिजे त्यांना हा विषय समजावून सांगितला पाहिजे. असा त्यांचा आग्रह असायचा. वेळ, पैसा आणि श्रम समाजासाठी खर्च करण्याची दादांची ही धडपड पाहून मलाही बळं मिळायचे, प्रेरणा मिळायची वाटायचे की, दादा या वयात इतकी मेहनत घेतात. त्यामुळे आपल्यालाही आणखी मेहनत करावी लागणार आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दादांसमवेत महाराष्ट्राच्या अनेक भागात गेलो. तिथे गेल्यानंतर दादा, त्या गावातील कार्यकर्त्याला किंवा नेत्याला नावानिशी ओळखायचे त्यांची ओळख काढायचे आणि मगं तो धागा पकडून आम्ही आमची भुमिका मांडायचो. त्यानंतर कांही वेळातच बघता, बघता ते कार्यकर्ते आणि समाजबांधव चळवळीशी जोडले जायचे त्यामुळे माणसं जोडण्याची एक अजब कला दादांच्या अंगी होती. संघटन कौशल्य कसे असावे त्याचे ते मुर्तीमंत उदाहरण होते.

बाळूमामांचे मंदीर उभारण्यासाठी दादांची धडपड सुरु होती. या मंदीरासाठी लागणा-या जागेची पाहणी करण्यासाठी दादा जयसिंगतात्या शेंडगे यांच्यासमवेत मलाही त्यांच्या गावी घेवून गेले होते. यावेळी त्यांनी गावातील विविध मंदीर फिरुन दाखविली होती. आणि गावात बाळुमामांचे मंदीर उभा करायचा मनोदय व्यक्त केला होता. या कामात त्यांना अनेकांनी मदत करण्याचीही तयारी दर्शवली होती. आता आपल्याला त्यांचे हे स्वप्नं साकार करावे लागणार आहे. धनगर आरक्षण लढाई जिंकणे हे त्यांचे आणखी एक स्वप्नं होते. कारण त्यासाठी त्यांनी स्व. शिवाजीबापू शेंडगे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यापासून ते आजतागायत अनेक लढे उभारते. त्यामध्ये त्यांनी आपले भरीव योगदानं दिले आहे. त्यामुळे ही लढाई देखिल आता आणखी जोमाने लढून जिंकावीच लागणार आहे. आणि मला खात्री आहे की दादा जिथे कुठे असतील तिथून या लढाईसाठी आपल्याला प्रेरणा देत राहतील….

दादा… तुम्ही पुन्हा परतून या…धनगर जमातीच्या उन्नती आणि प्रगतीसाठी हजारो हत्तींचे बळ घेवून या… आपला कार्यकर्ता – अमोल पांढरे

Nidhan Varta, महाराष्ट्र, श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *